कोल्हापूर:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अवमानाबद्दल भाजप खासदार असूनही छत्रपती संभाजीराजे यांनी श्री. फडणवीसांना माफी मागण्यासाठी ठणकावले. त्यांच्या या करारी व स्पष्टवक्तेपणाबद्दल आमचा मानाचा मुजरा . परंतु; महाराजांच्या इस्टेटी लाटून स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे मात्र गप्प राहिले. धन्य आहेत ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसदार, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील मूळ गादीची भक्ती आणि यांचीही भक्ती यातीलही जमीन-अस्मानचा फरक स्पष्ट होतो. तसेच राजकीय स्वार्थासाठी सातत्याने स्वतःला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार म्हणून एक प्रकारे कोल्हापूरच्या गादीचाही हे अवमानच करीत आहेत.या प्रसिद्धीपत्रकवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, नितीन दिंडे, संजय चितारी, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, रमेश माळी, संग्राम लाड, गंगाधर शेवडे, रविंद्र मर्दाने, संजय चितारी, माधवी मोरबाळे आदींच्या सह्या आहेत.या पत्रकात पुढे म्हटले आहे, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करताना त्यांचा “सामाजिक कार्यकर्ते” असा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे कोल्हापूरच नव्हे तर देशातील शाहूप्रेमी जनता खवळून उठली. त्याच दिवशी छत्रपती श्रीमंत शाहूमहाराज व छत्रपती संभाजीराजे यांनी माजी मुख्यमंत्री श्री . फडणवीस यांनी माफी मागावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्या स्वाभिमानी छत्रपती घराण्याला आमचा मानाचा मुजरा.परंतु; नुसत्या छत्रपती शाहू महाराजांचे इस्टेटीचे वारसदार झालेले आहेत, त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा झालेला अपमान दिसत नाही. ही घटना ते फारच हलक्यावर घेत आहेत. तसेच श्री. फडणवीस यांच्याकडून अनावधानाने वगैरे झालेली चूक, अशा शब्दांचा वापर करून हे वारसदारही पुन्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करण्याचा प्रमाद करीत आहेत. हे निषेधार्ह आहे. या इस्टेटीच्या वारसदारांना जनता भविष्य काळामध्ये माफ करणार नाही.कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळाचा कार्यक्रम हा सध्याच्या गादीचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. महाराजांच्या गादीचे प्रमुख उपस्थित असताना स्वतःला जनक म्हणून घेणे कितपत योग्य आहे? असा आमचा सवाल आहे.धन्य ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसदार! त्यांना महाराजांच्या पुरोगामी समतेचा विचार कधीच समजणार नाही. कारण या विचाराच्या एकदम विरोधी असणार्यांना आम्ही गरीब रयत कसे समजून सांगणार?
Leave a Reply