
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विकास निधीतून
महापालिकेला वैद्यकीय यंत्रसामग्रीसाठी २० लाखांची मदत
कोल्हापूर : कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून महापालिकेला २० लाख रुपयांची मदत करण्यात आली.कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक घटक आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आमदार जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयांची मदत महापालिकेला करण्यात आली. तशा आशयाचे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक पील्सचे (प्रतिबंधक गोळी) शहरातील सर्व नागरिकांना वाटप करण्याची सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत श्री. जाधव यांनी महापालिकेच्या वतीने कोरोनाविरुद्धच्या चाललेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. अगोदर या पील्स ज्यांचे वय ५० च्या वर आहे, अशा ज्येष्ठांना द्यावयाचे महापालिकेच्या वतीने ठरविण्यात आले होते, मात्र श्री. जाधव यांनी सर्व शहरवासियांना या पील्स द्या असे सांगितले शिवाय जे लोक आज बाहेरून येत आहेत त्यांनाही देण्याची सूचना केली.
यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्यासह डॉ. सत्यजित जाधव, डॉ. दश्मिता जाधव, डॉ. शीतल पाटील, डॉ. श्रीकांत लंगडे आदी उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, कोणताही दुष्परिणाम न होणाऱ्या या पील्स काहीही न खाता रोज चार पील्स याप्रमाणे तीन दिवस घेतल्या असता प्रतिकारशक्ती वाढते. शहरातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मदतीने वाटप करण्यात येणाऱ्या या पील्स कधी व कशा पद्धतीने वाटप करण्यात येईल, याचे नियोजन लवकरच करू.
दरम्यान, यावेळी शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम व शाहू क्लॉथ मार्केट येथील गाळेधारकांनी दुकाने सुरू करण्यासंदर्भात आमदार जाधव यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांसमवेत तेथील दुकानांची एकूण परिस्थिती पाहून निर्णय घेऊया, असे आश्वासन श्री. जाधव यांनी यावेळी दिले.तसेेच समाजातील बारा बलुतेदारांसह छोट्या छोट्या कित्येक घटकांचे लॉकडाउनमुळे जगणे आज कठीण झाले आहे. त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी अर्थसाह्यासह कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Leave a Reply