
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या ‘जॉब एक्स्पो-२०१६’ या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अंतर्गत सुमारे ७५०० उमेदवारांनी नोंदणी केली, तर सुमारे ४५०० उमेदवारांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती कक्षाचे समन्वयक डॉ. पी.एन. भोसले यांनी दिली.
विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाच्या वतीने राईट-वे ॲकेडमी, एस.टी.एस. व करिअरटाइम डॉट इन यांच्या सहकार्याने आज सकाळी ९ ते ६ या वेळेत ‘जॉब-एक्स्पो-२०१६’चे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक डॉ. भोसले व सहसमन्वयक डॉ. एम.के. भानारकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. बँकिंग, फायनान्स, मॅनेजमेंट, बीपीओ, केपीओ, ऑनलाईन डिलिव्हरी, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, आयटी, केमिकल, पेट्रोलियम, हॉटेल मॅनेजमेंट, एच.आर., सेल्स व मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट आदी क्षेत्रांतील ६० नामवंत कंपन्यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली. आज दिवसभरात सुमारे ४५०० उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या.
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक आणि संगणकशास्त्र अधिविभागांत मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. वेळेअभावी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेता येणे शक्य झाले नाही, त्यांचे अर्ज जमा करुन घेण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांना कंपन्या नंतर मुलाखतीसाठी बोलावून घेणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची यादी मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाकडे कंपन्यामार्फत लवकरच प्राप्त होणार असल्याची माहितीही डॉ. भोसले यांनी दिली आहे.
Leave a Reply