
कोल्हापूर:मुंबईहून झपाट्याने येणाऱ्या प्रवाशांचा भार कोल्हापूरला सोसेना झाला आहे. कोल्हापुरात आलेल्या ८६ हजार रुग्णांच्या तपासणी करण्याचे काम प्रलंबित आहे. अशात नव्याने प्रवाशांची भर पडणे हो सोसणारं नाही. त्यामुळे मुंबईतून कोल्हापूरला येण्यासाठी काही दिवस परवानगी देऊ नये, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.राज्य शासनाने परप्रांतातील लोकांबरोबरच राज्यातील लोकांनाही त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. याचा आधार घेत मुंबई-पुणे या ‘रेड झोन’ भागातील हजारो लोक कोल्हापूरकडे येत आहेत. या प्रवाशांच्या वाहनांची लांबलचक रांग वारणा नदी पुलाजवळ लागली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यामुळे चार दिवस रेड झोन आणि मुंबई पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरला पाठवू नये, अशी मागणी करणारे पत्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे.मुंबई आणि पुण्यावरून आत्तापर्यंत ८६ हजार लोक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मुंबईतमधून आलेल्या १२ जणांना बाधा झाली आहे. प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करून त्यांच्या अलगीकरणाबाबत निर्णय घेतला जात आहे. यामुळे प्रयोगशाळांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे आधीचे रिपोर्ट येईपर्यत रेड झोन व मुंबई पुण्याच्या नागरिकांनी थोडा संयम राखावा, असे आवाहन सुद्धा सतेज पाटील यांनी केले आहे. रेड झोनमधून येणाऱ्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. ही चिंताजनक बाब असल्याने हा निर्णय घेतला आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
काल एका दिवसात मुंबई पुण्यावरून तब्बल ६०० गाड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी तब्बल ४०० गाड्या मुंबईच्या होत्या. प्रवाशांचा हा वाढता ओघ पाहता मेडिकल इमर्जन्सी असेल तरच रेड झोन व मुंबई पुण्याच्या प्रवाशांना सोडावे, असे पाटील यांचे म्हणणे आहे. करोना पॉझिटिव्ह असतानाही दोन रुग्णांनी मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला, हे धक्कादायक असल्याकडे सतेज पाटील यांनी लक्ष वेधले.
Leave a Reply