
कोल्हापूर:मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले व सध्या मुंबईत खारघरला राहत असलेले राहुल भिमराव पोळ, वय -४८ व त्यांच्या पत्नी हे दोघेही दिव्यांग. लांबतच चाललेल्या लॉकडाऊनमुळे घरातील अन्नधान्य व पैसेही संपल्यामुळे कोल्हापूरला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दिव्यांगांसाठीच्या विशेष तीनचाकी मोटरसायकलवरूनच ते कोल्हापूरला निघाले. ई- पास नसल्यामुळे त्यांना किनी टोल नाक्यावरच आडवले. पोलिसांना ही सगळी परिस्थिती समजत होती. परंतु; आडवा येत होता तो कायदा.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत सेविंग खाते असलेल्या राहुल पोळ यांनी बँकेत फोन केला. शाखाधिकारी नंदकुमार जाधव यांनी तत्परतेने ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आणि प्रशासकीय अधिकारी जी. एम शिंदे यांना दिली. या दांपत्याची अडचण समजून घेऊन डॉ. माने व श्री. शिंदे यांनी श्री. पोळ यांच्या खात्यावरील सात हजार चारशे रुपये रक्कम काढून बँकेच्या कर्मचाऱ्यांना किनी टोल नाक्यावर पाठविले. बँकेची गाडी घेऊन शाखाधिकारी नंदकुमार जाधव, कॅशियर चित्रा चौगुले व क्लार्क सुहास गोंजारे किनी टोल नाक्यावर पोहोचले. भरल्या डोळ्यांनी बँक प्रशासनाचे ऋण व्यक्त करीत हे दाम्पत्य पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ झाले.गेले अडीच महिने कोरोना संसर्गाच्या काळातही या बँकेने ग्राहकांना सर्वच सेवा मोठ्या क्षमतेने व तत्परतेने दिले आहेत.
Leave a Reply