राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी विद्यापीठाला यजमानपद

 

20151117_205227-BlendCollageकोल्हापूर: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १३व्या ‘राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा २०१५-१६’साठी यजमान आयोजक म्हणून शिवाजी विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. भगवान माने यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

देशात सुजाण युवा नेतृत्वाचा विकास करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉ. भगवान माने यांनी नुकत्याच शिलाँग येथे पार पडलेल्या संसदीय कामकाजविषयक ओरिएंटेशन कोर्समध्ये सहभाग घेतला.

साधारण एप्रिलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातूनही ५५ विद्यार्थ्यांच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांनी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी अशा कमाल दोघांच्या संघाची लेखी नोंदणी २० फेब्रुवारीपर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाकडे करावी. अधिक माहितीसाठी डॉ. भगवान माने यांच्याशी ९७३०३१०६२० व ०२३१- २६०९२३५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांचे मार्गदर्शन तर विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड व राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. भारती पाटील यांचे सहकार्य लाभत आहे, असे डॉ. माने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!