
कोल्हापूर : संपूर्ण जगाला करोना विषाणूने ग्रासले आहे. महाराष्ट्र सुद्धा तब्बल १०० दिवस बंद आहे. अशातच गुढीपाडवा, रमजान ईद सारखे मोठे सण लोकांना साजरे करता आलेले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व सामान्य लोकांचे श्रद्धास्थान म्हणून पंढरपुरच्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. आषाढी एकादशीचे महत्त्व महाराष्ट्रात मोठे आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्राधान्य दिले जाते. पण यंदाच्या आषाढी एकदाशीला जणू कोरोनाचे ग्रहण लागले.विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार कोल्हापूरचा लेखक-दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी, संगीतकार अमित पाध्ये व सचिन गुरव यांच्याशी फोनवर चर्चा केली. सर्वांनी तत्काळ होकार दिला. लॉकडाऊनमुळे मुंबईत जाऊन प्रत्यक्ष जाऊन शुटींग करणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रत्येकाने आपण आहोत तिथूनच काम करायचे ठरले आणि साकारले विठ्ठलाचे आगळेवेगळे ‘दर्शन’.विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पारख्या झालेल्या भक्तांसाठी हि ध्वनीचित्रफित आषाढी एकादशी दिवशी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली. आणि ती लोकांच्या पसंतीस उतरून प्रचंड व्हायरल झाली.घरबसल्या विठ्ठल दर्शनाचा अनुभव लोकांना मिळाला. सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत असा महत्वाचा संदेश या ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे ‘दर्शन’ च्या टीममधील सर्व कलाकार तंत्रज्ञांनी निशुल्क काम केले आहे.चित्रपट क्षेत्र, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर लोकांनी गौरोव्द्गार काढले. लेखक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. या ध्वनीचित्रफितीमध्ये अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केले आहे, संकलन फैसल महाडिक, संगीत अमित पाध्ये, निर्मिती सचिन सुरेश गुरव यांनी केली आहे.याचे लेखन आणि संकल्पना कोल्हापूर मध्ये, संगीत देवगड मध्ये संकलन आणि चित्रीकरण मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी होऊन सुद्धा यशस्वी प्रयोग या सर्व तरुणांनी केला आहे, हे उल्लेखनीय आहे.सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांना कोल्हापूरच्या फुटबॉल वर बनवलेल्या ‘द सॉकर सिटी’ फिल्मसाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. ‘द सॉकर सिटी’ भारताबाहेर आंतरराष्ट्रीय अनेक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाली आहे. ‘द सॉकर सिटी’ पूर्णपणे कोल्हापुरात बनलेली फिल्म आहे.
Leave a Reply