
कोल्हापूर:कोल्हापुरातील कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, कोणत्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात किती खाटा व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, कोणत्या रुग्णालयातून रुग्ण डिस्चार्ज झाले, याची माहिती एका क्लिकवर मिळाली पाहिजे. तसेच कोरोना चाचणीचे अहवाल त्वरित मिळाले पाहिजेत, याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज केली.
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक झाली.
आमदार जाधव म्हणाले, शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण आहेत. त्यांनी स्वॅब तपासणीला दिले आहेत; मात्र त्याचे रिपॉर्ट वेळेत येत नाहीत. परिणामी रुग्णांवर उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. अनेक रुग्णांचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटव्ह आले आहेत. रिपॉर्ट आले नसल्याने लक्षण असणाऱ्या रुग्णावर कोवीड वॉर्डमध्ये की सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार करायचा असा प्रश्न डॉक्टरांना भेडसावत आहे. त्यामुळे स्वॅबचे रिपार्ट लवकरात लवकर मिळाले पाहिजेत.
शहरातील रुग्णालय हाऊसफुल्ल आहेत. रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व रुग्णालयातील माहिती वेळोवेळी अपडेट करून, ती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, असे नियोजन प्रशासनाने करावे अशी सूचना आमदार जाधव यांनी बैठकीत केली.
आमदार जाधव यांच्या सूचनांमधून रुग्णांबद्दलची काळजी व्यक्त होते. त्यामुळे या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असे कोवीड तपासणी प्रमुख संजना बागडी यांनी सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विभागप्रमुख डॉ. स्मिता देशपांडे, डॉ. वालावलकर, डॉ. शिवराज उपास्थित होते.
Leave a Reply