स्टार प्रवाहवर ‘देवा श्री गणेशा’ मालिकेतील गणपती बाप्पाची खास झलक

 

स्टार प्रवाहवर गणेश चतुर्थीपासून म्हणजेच २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ या गणपती विशेष मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. गणपती बाप्पाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतच्या अलौकिक गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने उलगडणार आहेत. या मालिकेच्या दिमाखदार प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे. या मालिकेतल्या गणपती बाप्पाची ही खास झलक आम्ही घेऊन आलो आहोत. बाप्पाचं हे देखणं रुप डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे. या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका साकारणार आहे अद्वैत कुलकर्णी. गणपती बाप्पाची भूमिका साकारायला मिळावी ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती आणि या मालिकेच्या निमित्ताने अद्वैतचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. गणपती बाप्पाप्रमाणेच अद्वैतला मोदक खायला खूप आवडतात. ‘देवा श्री गणेशा’ या मालिकेच्या निमित्ताने सेटवर मोदकांची मेजवानी दररोज असते. सेटवर संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूट करतो. सुरुवातीला बाप्पाच्या रुपात तयार होण्यासाठी २ तास लागायचे मात्र आता तासाभरात आमची टीम मला तयार करते असं अद्वैतने सांगितलं.या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दैनंदिन मालिकांच्या गर्दीत स्टार प्रवाह फक्त ११ विशेष भागांची मालिका घेऊन येत आहे. रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत ११ सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील. या भव्य मालिकेतून संस्कार घडवणाऱ्या छान गोष्टी भव्य स्वरुपात पहायला मिळणार आहेत. बाप्पाच्या या गोष्टी पहाताना मन गर्व आणि आनंदाने नक्कीच भरुन येईल अशी खात्री आहे.’   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!