घरफाळा घोटाळ्यावरून चाललेल्या आरोप-प्रत्यारोपावर ‘आप’ची टीका

 

कोल्हापूर:भाजप-ताराराणीचे नेते माजी खा. धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर पदाचा गैरवापर करून 10-15 कोटी रुपयांचा घरफाळा थकवल्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर देत पालकमंत्र्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवकांनी या आरोपांचे खंडन करत महाडिक यांच्यावर पार्किंगमधले गाळे पाडून विकल्याचे आरोप केले.या आरोप-प्रत्यारोपामुळे घरफाळा घोटाळ्याची व्याप्ती अगदी नेत्यांच्या संस्थांपर्यंत गेल्याचे समोर येत आहे. या घोटाळ्याची चर्चा फक्त आरोपांच्या राजकारणापुरती मर्यादीत न राहता घरफाळा घोटाळा नेमका किती झाला व यामध्ये कोणकोणत्या अधिकारी व कारभारी पदाधिकाऱ्यांचा व त्यांच्या नेत्यांचा सहभाग होता हे आता जनतेसमोर आले पाहिजे. घरफाळा घोटाळ्याची नेमकी व्याप्ती समजण्यासाठी या घोटाळ्याचे बाह्य लेखापरीक्षण (बाह्य ऑडिट) झाले पाहिजे. नेत्यांनी व समर्थकांनी लावलेल्या आरोपांची गंभीर दखल घेत प्रशासक डॉ. बलकवडे यांनी आरोपांची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे केली.घरफाळा घोटाळ्याचे बाह्य ऑडिट व्हावे ही मागणी ‘आप’ने सातत्याने लावून धरली आहे. यासाठी वेळोवेळी यावर आंदोलने देखील केली आहेत. या घोटाळ्यामध्ये आता नेत्यांची नावे देखील समोर आल्यामुळे या मागणीला जोर धरत आहे. महापालिका प्रशासकांनी यावर त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!