
कोल्हापूर : समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्ती करून घेऊन जीवनात यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कौशल्य मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू समागृहात झालेल्या या कार्यक्रमास राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपसंचालक दिलीप पवार प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कौशल्य विकास आणि रोजगार संधींची उपलब्धता अशा दुहेरी पातळ्यांवर विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचा हेतू या कौशल्य मेळाव्याच्या आयोजनामागे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही सुप्त कला-कौशल्ये असतात. केवळ त्यांची जाणीव होणे गरजेचे असते. त्यांना पूरक आणि अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या मेळाव्यातून आपल्याला प्राप्त व्हावीत आणि विविध व्यवसाय-उद्योगांमधून काम करण्याची संधी आपणास मिळावी, प्रेरणा मिळावी, या दृष्टीने हा मेळावा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींचा संदर्भ देऊन कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मेळाव्यास मुलींचे लक्षणीय प्रमाण स्वागतार्ह आहे. उपलब्ध संसाधनांमध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याचे कौशल्य महिलांमध्ये उपजतच असते. गृहिणी असणाऱ्या महिलांमध्येही अनेक कौशल्ये असतात. त्या कौशल्यांच्या बळावर संपूर्ण घराच्या कामकाजाचे त्या उत्तम पद्धतीने व्यवस्थापन करत असतात. त्याचा शिक्षणाची आणि तीव्र इच्छाशक्तीची जोड दिल्यास ही कौशल्ये अर्थार्जनाचेही उपयुक्त साधन बनू शकतात
Leave a Reply