
कोल्हापूर : जिल्ह्यातील सासद आदर्श ग्राम योजनेतील गावांमध्ये सर्व कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण करा तसेच ही गावे हंगणदारी मुक्त करण्याची सूचना खासदार राजू शेट्टी यांनी येथे बोलतांना केली.
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्दिष्टपूर्तींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हा दक्षता व संनियत्रण समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. बैठकीस समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई आदी मान्यवर समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील सांसद आदर्श योजनेंतर्गंत निवड केलेल्या पेरीड, राजगोळी खुर्द, सोनवडे आदी गावामध्ये तसेच आमदार आदर्श ग्राम योजनेतील निवडलेल्या गावांमध्येही विविध विकास कामे सर्वोच्च प्राधान्य क्रमाने करावीत, यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी कामे हाती घ्यावीत, असे सांगून खासदार राजू शेट्टी म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेतील गावे हागणदारी मुक्त करण्याच्या कामासही प्राधान्य द्यावे. तसेच सांसद आदर्श ग्राम म्हणून निवडलेल्या बुबनाळ या गावाच्या विकासाचा संपूर्ण आराखडा एप्रिलअखेर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असून स्वच्छ भारत अभियान शासन योजना आणि लोक सहभागातून अधिक गतिमान करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात हागणदारी मुक्तीच्या चळवळीला गती मिळाली असून आतापर्यंत चार तालुके, कोल्हापूर महानगरपालिका आणि आठ नगरपालिका हागणदारी मुक्त झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नजिकच्या काळात संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानसही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply