पासपोर्ट हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम:ज्ञानेश्वर मुळे

 

01_04_2016_PHOTO_01कोल्हापूर : सध्याच्या काळात पासपोर्ट हा व्यक्तींच्या आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनला आहे. याद्वारे व्यक्ती, समाज व देश यांच्या आर्थिक विकासाला मोलाचा हातभार लागतो, जग समजून घेणे, व्यवसाय, शिक्षण यासाठी देश-विदेशातील प्रवास महत्वाचा आहे. त्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. असे प्रतिपादन कॉन्सुलर पासपोर्ट, व्हीसा आणि परदेशातील भारतीय लोकांचे व्यवहार या विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे विदेश मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पासपोर्ट कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कँपचे उद्घाटन ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पोलीस उप अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उप जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.

लोकांना एकमेकांशी जोडणे हे आपले ध्येय असल्याचे सांगून ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, पासपोर्ट हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. कोणत्याही सक्षम कारणाशिवाय पोसपोर्ट नाकारता येत नाही असे सांगून ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूर येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले. आजचं जग झपाट्यानं बदलत आहे. दरवर्षी परदेशातील 70 लाख लोक विविध कारणांनी भारतात येतात. तर भारतातील सुमारे 1 कोटी 50 लाख लोक विविध कारणांनी परदेशी जातात. त्यांच्याशी संबंधित पासपोर्ट व्हीसा विषयक कामांमध्ये जनताभिमूख झाले आहे. भारत सरकार पासपोर्ट सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यासाठी 680 जिल्ह्यांबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यात आला आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड आणि निवडणूक ओखळपत्र असेल तर पासपोर्टपूर्व पोलीस पडताळणीची आवश्यकता नसल्याचे सांगून श्री. मुळे म्हणाले, देशात उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्र पासपोर्ट वितरणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तो पहिल्या क्रमांकावर यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार राजू शेट्टी यांनी पासपोट प्रक्रीयेबाबत सामान्य लोकांमध्ये अजूनही भीती आहे ही प्रक्रीया त्यांच्या सवयीची व्हावी यासाठी कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे, असे सांगून ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांच्या गुन्ह्यांचे स्वरुप पाहून पासपोर्ट दिले जावेत, पोलीस पडताळणीची प्रक्रीया जलद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार धनंजय महाडिक यांनी दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात संपन्नता आहे त्यामुळे येथील लोकांना पासपोर्ट जलद मिळावेत व व्यवसाय, शिक्षण, व्यापार याच्या संधी वृद्धींगत व्हाव्यात यासाठी कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय सुरु करावे यादृष्टीने पासपोर्ट डाक्युमेंट कलेक्शन सेंटर लवकर सुरु केले जावे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!