
कोल्हापूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सीपीआर रुग्णालयामध्ये आज जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आयोजित मधुमेह तपासणी व जनजागृती शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक आर. बी. मुगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने 7 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी जिवनशैली बदलूया मधुमेहाला रोखूया हे घोषवाक्य घेऊन 7 ते 14 एप्रिल या कालावधीत जागतिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी मधुमेह तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येऊन जास्तीतजास्त लोकांपर्यत मधुमेहाबाबत माहिती तसेच आरोग्यदायी आहार, नियमित व्यायम व तणावमुक्त जिवनशैली याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने मधुमेहाची तपासणी व तो दूर ठेवण्याबाबतची काळजी याबाबत माहिती घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षला वेदक यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply