मुंबई: राज्याच्या दुष्काळी भागातील तहानलेल्या जनतेसाठी करावयाच्या शासनाच्या मदतकार्याच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. भीषण पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या लातूरमधील नागरिकांसाठी आज पहाटे शहरात आलेली विशेष रेल्वे जणू जीवनच घेऊन आली आणि तहानेने व्याकुळ झालेल्या शहराला सरकारने मोठा दिलासा दिला. रेल्वेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्याची ही ऐतिहासिक उपाययोजना प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे सनियंत्रण मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. मिरज येथून लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी रेल्वे आज (दि. 12) पहाटे5 वाजता लातूर येथील रेल्वेस्थानकावर पोहोचली. या रेल्वेने दहा वाघिणींच्या सहाय्याने वाहून आणलेले सुमारे 5 लाख लिटर पाणी लातूर रेल्वेस्थानकाजवळील एका विहिरीत व्यवस्थित उतरवून घेण्यात आले. त्यानंतर 25 हजार लिटरच्या 20 टँकरद्वारे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात आले. शुद्धीकरण झालेले पाणी नंतर सहा हजार लिटर क्षमतेच्याटँकरद्वारे शहरातील नागरीकांना पुरवण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मिरज येथे दुसऱ्याट्रेनमध्ये पाणी भरण्याचे काम दुपारपासूनसुरू झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात लातूर येथे आयोजित बैठकीनंतर विविध उपाययोजनांची घोषणा केली होती.लातूरला पाणी पुरविण्यासाठी आवश्यक ते सर्व तातडीचे उपाय योजले जातील तसेच आवश्यकता भासल्यास रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही जाहीर केले होते. त्यानुसार लातूर शहरासाठी सध्या डोंगरगाव, माकणी आणि भंडारवाडी येथून पाणी आणले जात असून ते टँकरद्वारे पुरविले जात आहे.आता पाणी पुरवठ्यात रेल्वेद्वारे आणल्या जाणाऱ्या पाण्याची भर पडल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

Leave a Reply