
मुंबई:समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या विचारांमुळे आजही देश एकसंध आहे. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मारक उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विचार महोत्सवात ते बोलत होते. आयडीबीआय बँकेचे चेअरमन किशोर खरात अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस.स्थूल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. हर्षदीप कांबळे, केबिन ब्राऊन, निखिल मेश्राम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, देश एकसंध ठेवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मोठे योगदान आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मितीचे कार्य केले आहे. नदी जोडप्रकल्प व पाण्याच्या विकेंद्रीकरणाचे नियोजन या संकल्पना डॉ. आंबेडकरांनी त्या काळात मांडल्या.
आंबडवे येथे स्मारक
बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांतून येणाऱ्या पिढीला सतत स्फूर्ती मिळावी यासाठी त्यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करुन भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासंबंधीचा आराखडा तयार करत आहोत. या गावाला जाण्यासाठी हाऊस बोट व जेटीची सोयही करण्यात येणार आहे. आंबडवे गावाजवळून मुंबई-गोवा महामार्गाचा एक मार्ग नेण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे.
Leave a Reply