
कोल्हापूर : येत्या पावसाळयातील 1 जुलै रोजी एकाच दिवशी जिल्हयात 10 ते 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना दिली.
येत्या 1 जुलै 2016 रोजी राज्यात एकच दिवशी किमान दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख, उप विभागीय महसूल अधिकारी कुणाल खेमणार, मोनिका सिंह, अश्विनी जिरंगे, किर्ती नलवडे, यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील, सहाय्यक संचालक सुहास साळुंखे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, उपशिक्षणाधिकारी श्री. मोटे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदीजन उपस्थित होते.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यात येत्या पावसाळयात 1 ते 7 जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त 1 जुलै रोजी सर्व प्रशासकीय यंत्रणा, विद्यार्थी तसेच स्वयंसेवी, सेवाभावी, सहकारी संस्था तसेच लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जिल्ह्यात 1 जुलै रोजी सर्व यंत्रणा आणि लोकसहभागातून 10 ते 12 लाख रोपांची लागवड करण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी वृक्ष लागवडीचा कृति आराखडा तात्काळ तयार करावा. याकामी संबंधित विभागाच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी या संबंधिचे सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
Leave a Reply