
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवि पुजारीच्या नावाने कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार आणि धर्मशास्राचे गाढे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. डॉ. देसाई यांना अवघ्या ३६ तासांत दुसर्यांदा जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीने कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, सुभाष देसाई हे त्यांच्या शिवाजी स्टेडियममधील कार्यालयात दैनंदीन कामकाजात व्यस्त असतानाच, त्यांना लॅंडलाईनवरुन फोन आला आणि अत्यंत वरच्या पट्टीत तुमचे जे कार्य सुरु आहे, ते आता थांबवा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगत सज्जड दम भरण्यात आला. यावेळी सीआयडीचे पोलिस कर्मचारीही देसाई यांच्या कार्यालयात उपस्थित होते. देसाई यांनी त्यांच्याकडे तात्काळ हा फोन दिला, त्यानंतर संबंधिताने पुन्हा रवि पुजारीच्या नावानेच बोलण्यास सुरुवात केली आणि पुन्हा तशीच धमकी दिली. या धमकीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी जर कोणी रवि पुजारीचे नाव घेवून धमकावत असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देसाई यांनी केली आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मी ही अंबाबाई असून, ती शिवपत्नी आहे, अशी मांडणी डॉ. देसाई करत असल्याने त्यांना या धमक्या देण्यात येताहेत. १८ एप्रिलरोजी त्यांना धमकीचे निनावी पत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा रवि पुजारीच्या नावाने हा धमकीचा फोन आलाय.
Leave a Reply