
कोल्हापूर : चालू आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना आणि ओ. टी. एस. पी. साठी 329 कोटी 11 लाखाच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे होते.
जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार सत्यजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्यासह समितीचे सन्माननीय सदस्य, सदस्या उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना 2016-17 साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपीच्या 329 कोटी 11 लाखाच्या आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 226 कोटी 50 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 100 कोटी 81 लाख आणि ओटीएसपीसाठी 1 कोटी 80 लाखाच्या तरतुदीचा समावेश आहे. यामध्ये नाविण्यपूर्ण योजनेसाठी 8 कोटीचा निधी ठेवण्यात आला असून, यातून जलसंधारणाबरोबरच अन्य नाविण्यपूर्ण बाबींना प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, सामाजिक व सामुहिक सेवा, उर्जा, उद्योग, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवांसाठीच्या 226 कोटी 50 लाखांच्या तरतुदींचा समावेश आहे.
Leave a Reply