
मुंबई: कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीबाबत नगरविकास विभागाने तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दवाढीबाबत गेल्या अनेक वर्षापासून होत असलेल्या आग्रही मागणीचा विचार करुन आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागणीवर ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले.
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना1944 साली झाली व त्यानंतर सन 1972मध्ये कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आली. मात्र सन 1944 ते1972 या कालावधीत व त्यानंतर देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे हद्दवाढ झालेली नाही. नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर अनेकदा याबाबत निर्णय घेण्यासाठी आश्वासने देऊन समित्या गठित करण्यात आल्या होत्या, मात्र कोणताही ठोस निर्णय यावर अद्यापपर्यंत होऊ शकला नव्हता, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply