
कोल्हापूर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांचे भारतीय समाजाप्रती एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ‘पुढारीकार पद्मश्री कै. डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाले‘त‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य‘ या विषयावर ते बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की, मी प्रथमतः भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. स्वतःच्या भारतीयत्वाविषयी इतक्या निसंदिग्धपणे आणि अभिमानपूर्वक प्रतिपादन करणारा नेता या देशात दुसरा झाला नाही. या तीव्रतर भारतीयत्वाच्या जाणीवेतून भारतीय राज्यघटनेची अमोल देणगी त्यांनी भारतीय समाजाला प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते, कैवारी होतेच, राज्यघटनेचे शिल्पकारही होते; पण, त्यापुढे जाऊन ते एक थोर विधिज्ञ आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञही होते. बाबासाहेबांनी कायद्याचाअभ्यास केला असला तरी त्यांचे सर्व प्रबंध आणि पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. त्यामुळेच ते भारताचे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असल्याच्या बैठकीला एक ठोस परिमाण आहे. भारतीय स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या प्रत्येक संसदीय पदाला त्यांनी न्याय देतानासर्वसामान्य माणूस हाच समोर ठेवला होता. त्याच्या विकासाचे धोरण डोळ्यासमोर ठेवले होते.डॉ. जाधव म्हणाले, जोपर्यंत अस्पृश्यता मानणार नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी काँग्रेसचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अट घाला, अशी थेट मागणी महात्मा गांधी यांच्यासमोर बाणेदारपणे ठेवून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची तीव्रता त्यांना पटवून देणारे बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भातील भूमिकांमुळे वेळोवेळी राजकीय आणि तात्विक मतभेद उद्भवले. तरीही बाबासाहेबांचा भारतीय मंत्रीमंडळातील प्रवेश हा महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळेच होऊ शकला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोघांमधील संबंध कटुतेचे असले तरी, व्यक्तीपेक्षा देश मोठा हा संदेश देणारी कृती गांधीजींची राहिली, हे लक्षात घेतले पाहिजे.
Leave a Reply