
कोल्हापूर: साहित्य हे समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे. साहित्य संमेलनातून विधायक विचार समाजाला मिळतो व त्यामधूनच माणसाची जडणघडण होत असल्याने यापुढे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन वाढीस प्रयत्न करु असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या साहित्य संमेलनासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनाचे उद्घाटन बिहार राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत शाहू महाराज, तर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी शफाअत खान यांच्यासमवेत खासदार संजय काकडे, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, साहित्य हे माणसाच्या भावना व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा साहित्य संमेलनातून अनेक विचारवंत, लेखक, कलाकार एकत्र येत असल्याने नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळते व यामधून समाज संघटीत होतो. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे मनाला भावनारे साहित्य संमेलन असल्याचे सांगून त्यांनी या संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, माणसाने प्रचंड इच्छाशक्ती बाळगून स्पर्धात्मक जगामध्ये चौफेर निरीक्षण व अभ्यास करुन साहित्याची नवनिर्मिती करणे आवश्यक आहे. साहित्यामधून माणूस माणसाशी जोडला जातो. नव्या पिढीने विविधांगी वाचन करुन चौफेर ज्ञान आत्मसात करावे असेही ते म्हणाले.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, विविध जाती धर्माचे लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे मराठी ही सर्वसमावेशक भाषा आहे. मराठीभाषेमधून निर्माण होणारे साहित्य हे समाज एकसंघ होण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कोल्हापूरमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे ही विशेष आनंदाची बाब आहे.
यावेळी संमेलनाध्यक्ष शफाअत खान यांनी, साहित्याविषयी अधिक जाणीव निर्माण होण्याबरोबरच समाजामध्ये साहित्य प्रवाह बळकट होण्याची आवश्यकता आहे असे विचार अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. खासदार संजय काकडे, माजी आमदार पाशापटेल आदी मान्यवरांनीही यथोचीत मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच मान्यवर लेखकांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन व बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत गणी आजरेकर, प्रास्ताविक डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले. साहित्य संमेलनास आदिल फरास, कादर मलबारी यांच्यासह महाराष्ट्रातील विचारवंत तसेच विविध भागांतून आलेले लेखक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply