
कोल्हापूर: यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गाव पातळीवर गांव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी 1 जून पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बर्गे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चालूवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सक्षम आणि सजग ठेवण्यास प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, सर्व यंत्रणांनी आपाआपल्या विभागाचे आपत्ती व्यवस्थापनाचे सुक्ष्म आराखडे तात्काळ तयार करुन त्यानुसार येत्या पावसाळ्यात कार्यवाही करावी, तसेच सर्व विभागांनी येत्या 1 जून पासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी पावसाळा कालावधीत मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 129 गावे पुरबाधित होतात या गावात आपत्ती निवारणाच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना हाती घेण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, पुरबाधित गावात आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा करुन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे तसेच सर्व विभागांनी नोडल ऑफिसर यांची नेमणूक करावी याबरोबरच शोध व बचाव पत्के आणि आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. पुरबाधित 129 गावांमध्ये राधानगरी तालुक्यातील 11, करवीर तालुक्यातील 23, पन्हाळा तालुक्यातील 12, गगनबावडा तालुक्यातील 7, कागल तालुक्यातील 11, शिरोळ तालुक्यातील 38, भुदरगड तालुक्यातील 3, शाहूवाडी तालुक्यातील 5 आणि हातकणंगले तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे.
संभाव्य पुरपस्थितीत करावयाच्या उपयायोजनांचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, पुरबाधित गावात बचाव व मदत कार्य गतीमान करण्याची तयारी ठेवावी, पुरग्रस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थळांतरीत करावे त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, औषधोपचार, वीज, भोजन अशा सर्व व्यवस्था प्राधान्याने करण्याचे नियोजन करावे. पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांसाठी संपर्क व्यवस्था आणि स्थळांतरणाचे ठिकाण निश्चित करावे. पुरबाधित गावांना तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
आपत्ती व्यवस्थापनात हेतुपुरस्पर हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, पावसाळ्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी 24 तास सुरु ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये कसलीही कुचराई होता कामा नये, असेही ते म्हणाले. पुर आणि आतिवृष्टीमुळे काही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्षास देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. याकामी टाळाटाळ झाल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ड्रायवर्स आणि कंडेक्टर्स यांनी त्यांच्या निदर्शनास येणाऱ्या आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. आपत्तीच्या काळात सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने काम करावे व संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असेही ते म्हणाले.
Leave a Reply