
कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथील पाटील महाराज समाधी शेजारच्या मोकळ्या जागेत तरुणीचा सूऱ्याने भोकसून निर्घृण खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. तिच्यावर अज्ञात मारेकऱ्याने तब्बल 18 वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी सूरा, मेमरीकार्ड जप्त केले. तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून तपास सुरू केला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. याबाबत घटनास्थळावरू व पोलिसांकडून मिळालेली माहिती, आज सकाळी साडेसातच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते उदय निंबाळकर हे पंचगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करून ते नदी पात्राच्या पलीकडील पाटील समाधीच्या दर्शनासाठी जात होते. समाधी शेजारील डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेत एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ करवीर पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार करवीर पोलिस उप-अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अंदाजे गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले. तिचे वय अंदाचे 20 ते 23 वर्षे आहे. मारेकऱ्यांने तिच्या मानेवर, छातीवर, खुब्यात आणि पाठीवर असे सुऱ्याने 18 वार करून तिचा निर्घृण खून केला. मानेवर व खुब्यात खोलवर झालेल्या सहा वार तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. तरुणीच्या डाव्या हताचा अंगठा तुटला असून उजव्या हाताच्या बोटावरही खोलवर जखमा आणि कपडेही चिखलाने मळकटलेले होते. हल्लेखोराला प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेहा शेजारी पोलिसांना कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड मिळून आले. तसेच दहा ते पंधरा फुटावरील एका झाडाच्या मागे मारेकऱ्याने मातीत लपवून ठेवलेला सुरा पोलिसांच्या हाती लागला. मेमरी कार्ड व सूरा त्यांनी जप्त केला. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
Leave a Reply