
मुंबई :पहिला पाऊस आणि त्याच्या सोबतीने फुलणारं पहिलं प्रेम याची गंमत काही औरच. आकाशात ढग दाटून आले की मनात प्रेमाच्या भावनाही दाटून येतात मग अशा पावसात आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीसोबत फिरण्याची मज्जा निराळीच. पहिल्या पावसातल्या या पहिल्या प्रेमाची ही गंमत आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’या मालिकेतून. या मालिकेतील शिव आणि गौरीची प्रेमकथा सध्या चांगली फुलत आहे. शिवने गौरीकडे व्यक्त केलेल्या प्रेमाच्या भावना आणि अंताक्षरीतील गाण्यामधून गौरीने त्याला दिलेला होकार यामुळे ही प्रेमाची गोष्ट अजुनच रंगतदार बनली आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी सध्या स्वप्नरंजनात आहे. त्यांची हीच प्रेमकथा आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे एका छान रोमॅंटीक गाण्यामधून. ‘छाने लगा मदहोशी का समां’असे या गाण्याचे बोल आहेत. अभिजीत गायकवाड यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला ‘से बॅंड’ फेम समीर सप्तीसकरयाने संगीत दिलं असून मंदार पिलवलकरने ते गायलं आहे. या गाण्याच्या अनुभवाबद्दल शिव म्हणजेच रिषी सक्सेना म्हणतो की, “अशा प्रकारचं पावसातलं रोमॅंटींक गाणं करण्याची माझी खुप दिवसांची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचं हे चित्रीकरण आहे आणि ते करतांना खुप धम्माल आली.’’ तर गौरी म्हणजेच सायली म्हणाली की, “प्रत्येकमुलीचं स्वप्न असतं की आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत ज्याच्यावर आपण खुप प्रेम करतो त्याच्यासोबत पावसातले असे प्रेमळ क्षण अनुभवावे. मालिकेत गौरी शिववर असंच जिवापाड प्रेम करते आणि पहिल्या पावसात या दोघांचं हे पहिलं प्रेम जास्तच खुलणार आहे.” येत्या शुक्रवारी, २४ जूनला रात्री ९ वा. ‘काहे दिया परदेस’मालिकेतील हे गाणं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
Leave a Reply