किफायतशीर व शाश्वत शेतीसाठी गुंतवणूक नितांत गरजेची:मुख्यमंत्री

 

IMG_20160626_234829कोल्हापूर: पीक कर्जाचा जास्तीत जास्त लाभ घेत शेतकरी आपल्या शेतीचा विकास साधत आहेत. तथापी शाश्वत व किफायतशीर शेतीसाठी पूरक जोड व्यवसायांबरोबरच शेतीत ठोस गुणंतवणुकीची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  कागल येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी  मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील  हे होते . राज्याच्या सकल उत्पनात कृषी क्षेत्राचा 11 टक्के वाटा आहे. कृषी क्षेत्रावर आधारित 55 टक्के लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज पर्यंत पीक कर्जावर आपण पुष्कळ भर दिला आहे तथापी शेतीतील उत्पादकता वाढणे, शेतीत नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कमीत कमी पाण्यावर शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर या बाबींचा विचार करुन शेती आर्थिक दृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी शेतीत विविध मार्गाने गुंतवणूक व्हावी यासाठी आता प्रयत्नांची  गरज आहे. केंद्र शासनाने नव्याने जाहिर केलेल्या पीक योजनेचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले, शेकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. नव्या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा या हेतूने अनेक नियम शिथील केले आहेत. 2015 मध्ये 17 लक्ष शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते पण गतवर्षी राज्यातील 1 कोटी 13 लाख शेतकऱ्यांनी या पीक योजनेचा लाभ घेतला आहे. पाण्याचेही आर्थिक मुल्य असते हे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यास उत्पादकता वाढविण्यास मदत होते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कमीत कमी पाण्यात शेती कशी फुलवावी व किफायतशीर करावी  हे इस्त्रायल देशाने जगासमोर चांगले उदाहरण ठेवले आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, सुक्ष्म सिंचनावर भर द्यायला हवा. मोठी धरणं व्हायला हवीत यात शंका नाही पण शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढवून पाण्याचे सुयोग्य नियोजन करुन विकेंद्रीत साठे निर्माण करायला हवेत. पाटाच्या पाण्याची उत्पादकता व ठिबक सिंचनाद्वारे शेतीची उत्पादकता यामध्ये मोठा फरक आहे. या अनुषंगाने शासनाने आता कालव्यांऐवजी  नळाद्वारे पाणी पुरविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!