
मुंबई:झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. यात सहभागी झालेल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची हमखास चर्चा होणार हे ठरलेलं आहे. या कार्यक्रमाची हीच लोकप्रियता बघून यात आता बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम,विद्या बालन सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवुडचा भाईजान आणि दबंग खान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ४ आणि ५ जुलैला रात्री ९.३० वा. सलमान खान सोबत थुकरटवाडीतील मंडळींनी केलेली धम्माल बघायला मिळणार आहे.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकप्रिय कलाकारांच्या एखाद्या गाजलेल्या कलाकृतीवर आपला वेगळा चित्रपट काढण्याची हौस थुकरटवाडीतील मंडळींना आहे. सलमान खानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं होतं तो चित्रपट म्हणजे मैने प्यार किया. याच चित्रपटावर आधारित मैने ट्राय किया हे धम्माल स्किट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ज्यात प्रेमची भूमिका साकारलीये भाऊ कदमने तर सुमनची भूमिका केलीये श्रेया बुगडेने. आपल्या चित्रपटाचं हे नवं रूप बघून सलमानचीही हसून हसून पुरेवाट लागली.
Leave a Reply