
मुंबई:रात्रीची वेळ वैऱ्याची असते असं आपल्याघरातील बडे-बुजुर्ग नेहमीच सांगतात.. दिवसा राहणाऱ्या घराच्या अंगणात मुक्तपणे खेळणारे आपण अनेकजण रात्रीच्या अंधारात बाहेर पडायलाही घाबरतो.. ही भीती बाहेरच्या अंधारात असते की मनातल्या अंधारात ? हे रात्रीचे खेळ असतात की मनाचे? हे प्रश्न आपल्याला कायम पडतात… असेच काही उत्सुकतापूर्ण प्रश्न घेऊन ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका झी मराठीवर सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच या मालिकेने अवघा महाराष्ट्र व्यापला. आज या मालिकेने आपल्या भागांची शंभरीही यशस्वीपणे पार पाडलीये. या मालिकेचं हेच यश साजरं करण्यासाठी झी मराठीच्या वतीने नुकत्याच एका शानदार कार्यक्रमाचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यावेळी मालिकेतील सर्व मुख्य कलाकारांसह निर्माते संतोष अयाचित आणि सुनिल भोसले, दिग्दर्शक राजू सावंत आणि झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश मयेकर म्हणाले की, “आजच्या डेली सोपच्या युगात एखाद्या मालिकेने शंभर भाग पूर्ण करणे ही गोष्ट तशी सहज वाटत असली तरी या मालिकेच्या बाबतीत ही बाब एवढी सहज नव्हती. कारण यातील जवळपास प्रत्येक कलाकार नविन होता तसेच चित्रीकरण स्थळ मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर होतं. यात सर्वात मोठं आव्हान होतं ते कोकणात उन्हाळ्यातील दमट वातावरणातील चित्रीकरणाचं. पण हे आव्हान केवळ निर्माता दिग्दर्शकच नाही तर सर्वच टीमने स्वीकारलं. माझ्या टीमवर आणि निर्माते तसेच कलाकारांवर माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्या मेहनतीनेमुळेच मालिकेला हे यश मिळालं आहे.” यावेळी मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा मानपत्र देऊन गौरवही करण्यात आला.
Leave a Reply