
कोल्हापूर:सहकार आणि खाजगी क्षेत्रातील साखर उद्योगासमोरील आगामी काळातील बदलते संदर्भ,आव्हाने आणि त्या संदर्भाने लवचिकतेने करावयाचे बदल अशा विविध पैलूंनी समग्र विचारमंथन करणाऱ्या भारतीय शुगर पुणे आयोजित दोन दिवसीय शुगर एक्स्पो आणि ऊसकरी शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन उद्या सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी विद्यापीठातील पदवीदान सभागृहात प्रारंभ होणार आहे.यात महाराष्ट्रासह गुजरात,आंध्रप्रदेश तामिळनाडू कर्नाटक राज्यातील साखर उद्योगातील दिग्गज अभ्यासक तज्ञ तसेच संचालक कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत.यावेळी प्रारंभीच्या चाचणी हंगामात विक्रमी गाळप करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील संताजी घोरपडे साखर कारखान्यासह विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.तसेच २७ शोधनिबंध सादर होणार आहेत.अशी माहिती मुख्य संयोजक आणि भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे आणि संग्रामसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसाच्या या सत्रात उद्या साखर उद्योगावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून यात ऊस शेती ते साखर निर्मितीच्या विविध टप्प्यात पाण्याचे शास्त्रशुध्द नियोजन आणि बचत या विषयांवर जे.पी.मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत.यानंतर खाजगी आणि सहकार क्षेत्रातील अमुल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणार आहे.यात जुन्नर साखर कारखाना,दौंड शुगर,कृष्णा साखर कारखाना,अथणी,गोदावरी बायोरेफनरीज,बागलकोट त्याचबरोबर गुजरातचे मनीषभाई पटेल,एस.एस.इंजिनीअरिंग पुणे येथील एस.बी.भडजी आणि दूधगंगा कृष्णा साखर कारखान्याचे अमित कोरजे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.तसेच ९ जुलैच्या सत्रात ऊस उत्पादक शेतकरी,संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी होणाऱ्या चर्चासत्रात कमी पाण्यात येणाऱ्या ऊस जाती आणि त्यांचे संगोपन यासह पेरणी ते साखर कारखान्यापर्यंत वाहतुक याचे खर्च व मनुष्यबळ बचतीसह शास्त्रशुद्ध नियोजन याविषयी विविध तज्ञ मागर्दर्शन करणार आहेत. दोन दिवसीय या सत्रात प्रगतशील शेतकरी आणि संशोधकांचा गौरव करण्यात येणार आहे.यामुळे साखर उद्योगाच्या आगामी काळातील आव्हानांवर मात करण्यासाठी निश्चित दिशा मिळणार आहे.पत्रकार परिषदेला ट्रस्टी रणवीरसिंह शिंदे,डी.एस.गुरव,पी.पी.खेडकर उपस्थित होते.
Leave a Reply