
कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी 5 वाजता 42 फुट 2 इंचावर पोहचली असून धोका पातळीकडे वाटचाल केली असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे.
पुर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांना प्रशासनाने प्राधान्य दिले असून पुराचा धोका असणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या कामी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन संभाव्य आपत्तीचा मुकाबला करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. लोकांनीही संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने निश्चित केलेल्या तात्पुरता निवारा केंद्रामध्ये स्थलांतरीत व्हावे तसेच जनावरांसाठी निश्चित केलेल्या जागेवर जनावरे हलवावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील 28 रस्ते पाण्याखाली गेले असून 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर पंचगंगा नदीचे पाणी धोकापातळीकडे गेले असून सायंकाळी 5 वाजता राजाराम बंंधाऱ्याची 42 फुट 2 इंच इतकी पाणी पातळी होती आणि 43 फुट ही धोका पातळी आहे. त्यामुळे नदीकाठच्या व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.
संभाव्य काळात आपत्ती निवारणाच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सतर्क असून पुरबाधित गावांना पुरपरिस्थितीच्या सूचना प्रशासनामार्फत दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे जीवन ज्योत सेवा संस्थेच्या 10 जवानांचा गट, इनफ्लेटेबल रबर बोट असे पथक तैनात केले आहे. आपत्ती परिस्थितीत मदतीसाठी आणि संपर्कासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अहोरात्र कार्यरत असून त्यांचा टोल फ्रि हेल्प लाईन क्रमांक 1077, दूरध्वनी 0231-2659232, 2652950, 2652953, 2652954 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे.
Leave a Reply