
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने 72 बंधारे पाण्याखाली गेले असून 24 रस्ते बंद झाले आहेत. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आली असून, कोल्हापूरातील सुतारवाडा येथील पाच कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना दिली.
पावसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्रथकाला पाचारण केले असून प्रशासनास मदत व बचाव कार्यात सहाय्यभूत ठरणारी या पथकाची 40 जवानांची टिम 6 बोटीसह कोल्हापूरात दाखल झाली आहे. याबरोबरच प्रशासनाकडे असलेल्या बोटी पुरबाधित तालुक्यांसाठी रवाना केल्या असून व्हाईट आर्मी, जीवन ज्योती सेवा संस्था यांची यंत्रणाही दक्ष ठेवली आहे. पुर परिस्थितीवर प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले.
संभाव्य पुर परिस्थिती उद्भवल्यास लोकांनी घाबरुन न जाता मदत व बचाव कार्यासाठी प्रशासनामार्फत सुरु केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी टोल फ्रि हेल्प लाईन क्रमांक 1077, तसेच 0231-2659232, 2652950, 2652953, 2652954 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. पुरग्रस्त जनतेला सहाय्यभूत होण्यासाठी विविध संस्था, असोसिएशन्स यांना काही मदत करावयाची असल्यास त्यांनी या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुर परिस्थितीत रस्ते आणि बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतांना लोकांनी या बंधाऱ्यावरुन न जाता अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. तरुणांनी पाण्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. शिवाजी पूल तसेच शेजारील नवीन पुलाच्या काठावरुन फोटो काढण्याचा किंवा पूर पाहण्याचा कोणीही प्रयत्न करु नये तसेच पिण्याचे पाणी क्लोरिनेशन करुनच घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. पूर परिस्थितीत प्रशासनामार्फत केलेली उपाययोजना आणि दक्षतेचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी 7 वाजता 43 फुट झाली असल्याने नदीकाठच्या लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगावी तथापि पुरबाधित गावातील लोकांच्या बचाव व मदत कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
Leave a Reply