कन्यागत महापर्वकाल सोहळा कृष्णाकाठ उत्सवासाठी सज्ज

 

कोल्हापूर  : कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठ सज्ज झाला असून नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, आलास, गणेशवाडी, शिरोळ, खिद्रापुर या ठिकाणी विविध विकासकामे गतीमान झाली असून 12 वर्षांनी येणाऱ्या कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी संपुर्ण कृष्णाकाठ सज्ज झाला आहे.
नृसिंहवाडी, गणेशवाडी, औरवाड येथील घाटांची कामे गतीमान असून नृसिंहवाडी येथे दत्त मंदिर, गणेशवाडी येथे गणेश मंदिर, शिरोळ येथे भोजनपात्र आणि खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदीर या पाच ठिकाणी शासनाच्या वतीने कन्यागत महापर्वकाल सोहळ्यानिमित्त विविध विकासकामे हाती घेतली आहे. या कामांना गती देऊन सोहळा उत्साहपुर्ण वातावरणात साजारा व्हावा या दृष्टीने भाविकांसाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासनही सज्ज झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भाविकांसाठी स्नानाची व्यवस्था, घाटांचे सुशोभिकरण, दर्शनरांग, पार्किंग व्यवस्था, पालखी मार्गालगतची रस्ते/गटारी, आरोग्य, स्वच्छता व पाण्याची व्यवस्था, भक्त निवास, दिशा दर्शन फलक ,विद्युत व्यवथा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध सुविधांचा अतंर्भाव केला आहे.
शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीवर नृसिंहवाडी, औरवाड, गणेशवाडी येथे घाट बांधणेचे काम हाती घेण्यात आले असून बहुतांशी कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. या कामांवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कन्यागत महापर्वकाल सोहळ्यानिमित्त प्रशासनाने हाती घेतलेली कामे अधिक दर्जेदार आणि गतीने करण्याचे निर्देशही सर्व यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या कामी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
या वर्षी कन्यागत महापर्वकाल ऑगस्ट 2016 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत साजरा होत असून शासनाने या कामांसाठी 121 कोटींचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात कन्यागत सोहळ्यासाठीच्या आवश्यक सुविधांसाठी 65 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. वरील सर्व ठिकाणी कन्यागत महापर्वकाल सोहळ्यामध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीनेही प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून अनेक भाविक या सोहळ्यासाठी कृष्णानदीकाठी येतात. हा सोहळा शांततेत आणि उत्साहपुर्ण वातावरणात पार पडवा यासाठी शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या सर्व गावकऱ्यांबरेाबरच प्रशासकीय यंत्राणाही सज्ज आहे. श्री नृसिंहवाडी येथे दत्तमंदीराबरोबरच औरवाड येथे दत्त महाराजांचे मुख्यस्थान, गणेशवाडी कृष्णानदी पश्चिमवाहिनी मुख्यस्थान, शिरोळ येथे भोजनपात्र, खिद्रापूर येथे कोपेश्वर पुरातन मंदिर आहे. कन्यागत महापर्वकाल सोहळ्यासाठी कृष्णाकाटी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!