
मुंबई :मराठी रंगभूमी आणि चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय आणि महेश मांजरेकर यांचे उत्तम दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या ३१ जुलैला सायंकाळी ७ वा झी मराठीवरून होत आहे.तीन दशकांहूनही अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवलेलं नटसम्राट हे नाटक कायम ओळखलं गेलं ते यातील अभिनय,संवाद आणि अप्पासाहेब बेलवलकरांच्या शोकांतिकेसाठी. अभिनयाची कारकिर्द भरात असताना कायम प्रकाशझोतात राहणारा हा नट कालपरत्वे या प्रकाशझोतापासून दूर जातो आणि त्याच्या नशिबी येतात अंधाराच्या वाटा.. त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा रसिक प्रेक्षकच नव्हे तर त्याची स्वतःची मुलेही त्याला स्वतःपासून दूर करतात. आपल्या लोकांशी आणि रंगभूमीशी नातं तुटलेला हा नटसम्राट आपल्या पत्नीसोबत या जगापासून दूर जात हलाखीचं जीवन जगतो त्याच्या याच शोकांतिकेची गाथा म्हणजे नटसम्राट हे नाटक. याच नाटकावर आधारित ‘नटसम्राट’ चित्रपटामधून ही शोकांतिका रूपेरी पडद्यावर आली आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत बहुगुणी अभिनेते नाना पाटेकर,कावेरीच्या भूमिकेतील मेधा मांजरेकरयांच्या सोबतीला सुनिल बर्वे, अजित परब, नेहा पेंडसे आणि मृण्मयी देशपांडे या सर्वांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलसं केलं. याशिवाय अप्पासाहेबांच्या मित्राची भूमिका साकारणा-या विक्रम गोखलेंच्या नव्या पात्राचीही समीक्षक आणि प्रेक्षकांनी प्रशंसा केली आहे.
Leave a Reply