
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून येत्या ऑक्टोबरमध्ये कोल्हापूर महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केली.
जिल्हा पर्यटन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होेते. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार राजेश क्षिरसागर, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा 255 कोटी रुपयांचा असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठी 72 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरकरांसाठी श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा असून या कामी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यामध्ये भाविकांची सोय, पार्किंग आणि भक्त निवास, दर्शन मंडप याबाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळ सोहळ्या निमित्त सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले दर 12 वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा यंदा उत्साही आणि भक्तीमय वातारणात साजरा करुन कोल्हापूर जिल्ह्यात श्रद्धा आणि पर्यटनाची संधी उपलब्ध करुन देण्याकामी सर्वांची सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कन्यागत महापर्वकाळा निमित्त कृष्णाकाठी तयार करण्यात आलेल्या घाटांवर आवश्यक विद्युत व्यवस्था तसेच पुरेशा बोटींची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कन्यागत महापर्वकाळात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची सुचनाही त्यांनी केली.
कन्यागत महापर्वकाळ सोहळ्या निमित्त तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचा शुभारंभही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी मान्यवर पदाधिकारी आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
तत्पुर्वी सकाळी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या रेट्रो रिफ्लेक्टीव बोर्डचे अनावरणही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गांवर हे बोर्ड बसविण्यात येणार आहेत.
Leave a Reply