
मुंबई: कोल्हापूर शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसंदर्भात येत्या पंधरा दिवसात दोन्ही बाजूच्या सर्व संबंधितांशी वैयक्तिक चर्चा करून व लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 18 गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यासंदर्भात आज विधानभवनात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामणे यांच्यासह प्रस्तावित हद्दवाढ भागातील ग्रामस्थ आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या 18 गावातील हद्दवाढ विरोधी कृती समितीचे नेते, ग्रामस्थ आणि हद्दवाढ व्हावी, अशी मागणी करणाऱ्या शहरातील नागरिकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. आमदार मिणचेकर, महाडिक, क्षीरसागर, महापौर श्रीमती रामणे यांच्यासह प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हद्दवाढीसंदर्भातील दोन्ही बाजूंच्या भूमिकेचा अहवाल प्राप्त आहे. ग्रामीण भागातील लोकांचा विरोध का आहे याचेही मत मांडण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात स्वतः या दोन्ही बाजूंकडील नेत्यांचे वैयक्तिक म्हणणे समजावून घेऊन चर्चा करणार आहे. त्यानंतर गुणवत्तेच्या निकषावर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
Leave a Reply