
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू असून गेल्या 24 तासात 42 मि.मि. पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील धरणे भरली असून काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले असून त्यातून 9 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी सतत वाढत आहे. यासह कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी, धामणी या नद्यांच्या पात्राच्या बाहेर पाणी जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरीही प्रशासन सज्ज आहे, असेसांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेनेही काळजी घ्यावी, नदी पात्राजवळ जाऊ नये, पाणी आलेल्या रस्ते ओलांडू नयेत, वाहने पाण्यात घालू नयेत, सेल्फी काढण्यासाठी पाण्यात जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
जिल्ह्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरु असून नद्यांच्या पाणी पात्राबाहेर आले आहे. राधानगरीतून होणारा 9000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग, कासारी धरणातून होणारा 4500 क्युसेसचा विसर्ग, कुंभी धरणातून होणारा 2000 क्युसेसचा विसर्ग असे एकूण सुमारे 16000 हजार क्युसेस पाण्याचा पंचगंगेतून विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे, हे पाणी कोल्हापूरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पोहचेल त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे. स्थलांतरीत करण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्याची सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ब्रिटिश कालीन 100 वर्षापूर्वीचे तीन पुल असून पावसाळ्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये देवगड निपाणी रत्यावरील निढोरी पुल (सन 1903), अंबोली संकेश्वर मार्गावरील व्हिकटोरीया पुल (सन 1887), विजयदुर्ग कोल्हापूर मार्गावरील बालिंगा पुल (सन 1855) यांचा समावेश आहे. हे पुल सुस्थितीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम यंत्रणेकडून सांगण्यात आल्याचेही डॉ. सैनी यांनी सांगितले.
शिवाजी पुल नॅशनल हायवे ऍ़थॉरिटीकडे असून 4 यंत्रणांची टिम त्या ठिकाणी पाठवून पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये नॅशनल हायवे ऍ़थॉरिटीचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश होता. मच्छींद्रीपर्यंत पाणी आल्यास तो पुल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णयही आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकी घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाण्याचा विसर्ग ज्या पध्दतीने सुरु आहे त्यानुसार हा पुल आज रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात येईल. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस ठेवण्यात येतील. त्या ठिकाणची वाहतूक शिये मार्गे वाहतूक वळविण्यात येईल. पाणी पातळी आटोक्यात आल्यानंतर नॅशनल हायवे ऍ़थॉरिटीकडून या पुलाच्या वस्तुस्थितीबद्दल अहवाल घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील 40 बंधारे पाण्याखाली असून सर्व गावांशी संपर्क सुरु असल्याचे सांगून डॉ. सैनी यांनी राज्य परिवहन बसेस सुरळीत असल्याचे सांगितले.
Leave a Reply