अलिबाग : महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुल कोसळल्याने वाहून गेलेल्या वाहनातील बेपत्ता व्यक्ती पैकी आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत एकूण एकवीस जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटलेली असून सदरील मृतदेह शवविच्छेदना नंतर संबंधितांच्या गावी पाठविण्यात येत आहेत.महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या व वाहनांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युध्द पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. महाड येथे काल आपत्ती निवारण व मदत केंद्र उभारुन शोध मोहिमेबाबत सर्व संबंधितांना माहिती देण्यात येत आहे. पालकमंत्री प्रकाश महेता,जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक हे शोध व मदत कार्याबाबत नियंत्रण करीत आहेत.या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा तसेच वाहनांचा शोध घेण्यासाठी पाण्यामध्ये सेंसरद्वारे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आज जिल्हा प्रशासनाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडेही (इस्त्रो) मदतीसाठी विचारणा केली. मात्र ही संस्था जमीन व हवेत कार्य करीत असल्याने त्यांची मदत होत नाही. तथापि शोधकार्यासाठी तटरक्षक दल व हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत होत असून एन.डी.आर.एफ.च्या एकूण चार पथकातील 160 जवान तसेच 9बोटी व 8 डायव्हर्सद्वारे ही शोध कार्य सुरु आहे. स्थानिक पातळीवरील 35पट्टीचे पोहणारे, 5 राफ्टरर्स, 6 केकेज् टीम त्याचप्रमाणे स्थानिक मच्छिमार बांधव यांच्या मदतीने शोध मोहिम सुरु आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेचेही जवळपास 350 अधिकारी, कर्मचारी मदत करीत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली 6 डॉक्टरांचे पथक, 12पेक्षा अधिक रुग्णवाहिकेसह कार्यरत आहेत. नागरी संरक्षण दल, एस.टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध स्वयंसेवी संस्था, श्री संत निरंकारी मंडळ, सह्याद्री ॲडव्हेंन्चर ट्रेकर महाबळेश्वर यांचे पथक, व्हाईट आर्मी जीवन मुक्ती सेवा संस्था, कुंडलिका राफ्टींग असोशिएश्न, श्रमिक मच्छिमार संघ, मालवण आदिंचा मोठा सहभाग शोध मोहिमेत आहे. अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शोध मोहिमेचे कार्य सुरु आहे. नदी प्रवाहाच्या पुढील भागातही त्या-त्या ठिकाणचे तालुका प्रशासन स्थानिकांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.
Leave a Reply