स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरात पालकमंत्र्यांंच्या हस्ते ध्वजारोहण

 

15 Aug 2016कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर आश्विनी रामाणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा विमल पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, ज्येष्ठ नेते पद्मश्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापलिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपमहापौर शमा मुल्ला, अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छ दिल्या.
यावेळी पोलीस दलातील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नैसर्गिक आपत्ती विशेषत: पूर परिस्थितीत बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचाही प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. महिला व बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत महिलांना प्रशस्तीपत्र, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत उत्कष्ठ काम केलेल्या संस्था आणि व्यक्ती, तसेच ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या संस्था, व्यक्ती तसेच एनसीसी ग्रुपचाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातउल्लेखनीय काम करुन जनतेचे हीत जोपासणाऱ्या वरिश्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा समावेश होता.पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यास उभे राहताच त्यांनी स्वत:हून प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक करुन त्यांचा सत्कार करण्याची सूचना केली. थोर स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महसुल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची कार्यवाही करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून, यासाठी या क्षेत्रातील जून्या कायद्यांचा अभ्यास आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल. याबरोबरच अकारी पड जमिनी जमीन मालकांना परत करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. यापुढील काळात वतन जमिनी एकदा नजराणा घेवून नावावर केल्यास पुन्हा विकताना महसूल विभागाच्या परवानगीची गरज भासणार नाही. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात सात-बारावर पुरुषांबरोबर महिलेचे नाव चढविण्याचे विशेष अभियान महसूल विभागामार्फत हाती घेतले जाईल अशी घोषणा करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महसूल सप्ताहामधून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक महिलांचे नाव सात-बारावर चढविण्यात आले आहे. या महिलांना शेतीविषयक माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी महसूल सप्ताहाची व्याप्ती वाढवून तो महसूल पंधरवडा करण्यात आला. यापुढील काळातही पुरुषांबरोबर महिलेचे नाव सात-बारावर चढवितांना कसलीही फी आकारली जाणार नाही.

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्याउद्देशाने तसेच जुन्या पुलांबाबत योग्यतो निर्णय घेता यावा, यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची तसेच अभियंत्यांची कार्यशाळा घेवून त्यातून याबाबतच्या उपाययोजना घेतल्या जातील, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एकट्या पुणे विभागात जवळपास 2 हजार 300 जुने पुल असून यामध्ये168 ब्रिटीशकालीन पुलांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ब्रिटीशकालीन पुलांचे येत्या 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. भविष्यात महाड सारखी दुर्घटना घडणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!