

‘यापुढील वैज्ञानिक प्रगतीच्या युगामध्ये, वेदिक व मॉडर्न सायन्स, वेदिक व आधुनिक गणित, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, लॉजिक, रोगशास्त्र, संख्याशास्त्र, दर्शनशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास करून, विशेष करून जे युवक शारिरीकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र आणि अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत, तसेच नैतिकदृष्ट्या चारित्र्यसंपन्न आणि शिस्तप्रिय असतील, असे युवकच यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून जगभर ओळखले जातील आणि त्यांना भारतातीलच नव्हे तर जगभरातील संपूर्ण कार्पोरेट क्षेत्रांमध्ये मोठी मागणी असणार आहे. ही मागणी लक्षात घेऊनच, ‘महर्षि वेदव्यास वेदिक सायन्सेस आणि एथिकल मॅनेजमेंट’ हे महाविद्यालय एमआयटी, पुणेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
या संस्थेमध्ये ज्ञान-विज्ञानाधिष्ठित अशा प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यासक्रम शिकवीला जाणार असून, नैतिक मूल्यांवर आधारित असलेले व्यवस्थापनशास्त्र आणि त्याद्वारे विविध क्षेत्रांमध्ये, म्हणजे प्रशासन, समाजकारण, माहिती तंत्रज्ञान, अध्यात्म, आधुनिक व्यवस्थापनशास्त्र, उद्योग, माध्यमे अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्वक्षम असे सर्वांगीण यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्व विकासासाठीची ही आगळीवेगळी, आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रथमच अशा प्रकारची ‘मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणाद्वारे, स्वामी विवेकानंदांच्या उक्तीनुसार ‘विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधणारी’ शैक्षणिक संस्था स्थापन्यात आली आहे. या द्वारे देशभरच्या विद्यार्थ्याना या एका नवीन व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जगभरात संधी मिळेल.
या ‘महर्षि वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस अँड एथिकल मॅनेजमेंट’ संस्थेमध्ये अमेरिकेतील जगप्रसिद्ध विद्यापीठातून संगणक शास्त्रात डॉक्टरेट असलेले आणि संस्कृतचे गाढे विद्वान डॉ. साई सुसरला – रामकृष्ण, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे संगणक शास्त्राचे प्रा. कांचे गोपीनाथ आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे प्रा. श्रीनिवास वरखेडी अशा तज्ञ व मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत सं. पांडव, योगविद्या आणि ताणतणावाचे व्यवस्थापन व संशोधनासाठी डॉ. हेमंत भार्गव, डॉ. शिवाजी चोबे आणि प्रसिद्ध योगाचार्य श्री. मारूती पाडेकर या योगशास्त्रातील तज्ञ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. त्याचबरोबर, एथिकल मॅनेजमेंट, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र अशा विविध विषयाचे जाणकार डॉ. संजय उपाध्ये आणि इतर अनेक मान्यवर या संस्थेतील विद्यार्थ्याचे सर्वांगीण यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविन्यासाठी मार्गदर्शन करतील.
या महाविद्यालयात बॅचलर ऑफ वैदिक सायन्स, मास्टर ऑफ वैदिक सायन्स आणि पीएचडीचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्याला तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही पदवीधारकाला या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.
अशी माहिती जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, प्रसिद्ध योगाचार्य श्री. मारूती पाडेकर, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Leave a Reply