कोल्हापूर : यावर्षी उद्भवलेली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता कोल्हापूर शहरवासियांना महापालिकेतर्फे तब्बल साडेचार महिने दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मार्च- एप्रिलमध्ये राधानगरी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने बचतीसाठी उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनातर्फे १ एप्रिलपासून कोल्हापूर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली असली, तरी यदांच्या वर्षी मुसळधार पाउस झाला आहे. जिल्हातील बहुतांश धरणे भरली आहेत. नद्याही दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांना मुबलक व दररोज पाणी पुरवठा करणे आवश्यक असतानाही आजतागायत दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ऐन सणासुधीच्या काळामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा होणे हा नागरिकांवर अन्याय असून, येत्या दोन दिवसात दररोज पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घ्या अन्यथा आयुक्तांचे पाणी कनेक्शन बंद करू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने दिला. शहरात सुरु असलेल्या दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत शिवसेनेने आज महानगर पालिकेवर मोर्चा काढला.
मोर्चाची सुरवात शिवसेना शहर कार्यालयापासून झाली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, दिवसाआड पाणी पुरवठा करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी मोर्चा परिसर दणाणून सोडला. मोर्चा महानगरपालिकेवर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत आक्रमक महिलांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना गटनेते नियाज खाण यांनी मा. महापौर यांच्याशी संपर्क साधला. यावर मा. महापौर यांनी शिष्ठमंडळास आमंत्रित केले. त्याच बरोबर आयुक्त महोदयांशी संपर्क साधून बैठकीस बोलून घेतले.
यानंतर मा. महापौर यांच्या दालनामध्ये शिवसेना पदाधिकार्यांनी पाणी पुरवठ्याबाबत महापालिका प्रशासनास जाब विचारला. पाण्याचा अपव्यय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे होत असताना, त्याचे पाप नागरिकांच्या माथी मारण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरातील पाईप लाईनला लागलेली गळती आणि त्यातून वाया जाणारे हजारो लिटर पाणी याकडे लक्ष देणे गरजेचे असताना नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधावर गदा आणण्याचे काम महानगरपालिका प्रशासन करीत आहे. पाणी गळतीतील अपयश लपविण्यासाठीच महानगरपालिकेने दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप हि शिवसैनिकांनी केला.
यावेळी बोलताना शिवसेना गटनेता नियाज खान यांनी, दिवसाआड पाणी पुरवठा सुरु होऊन चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु दिवसाआड पाणी पुरवठा होऊनही नागरिकांच्या पाणी बिलामध्ये फारसा फरक दिसून येत नाही आहे. पूर्वी एवढेच पाणी बील नागरिकांकडून आकारण्यात येत आहे. याकडे अधिकार्यांनी साफ दुर्लक्ष केले असून, पाणी बिलाद्वारे नागरिकांची लुट केली जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी पाणी वाटपामध्ये दुजाभाव करीत आहेत. लोकप्रतिनिधी असल्याने नागरीक आमच्याकडे विचारणा करीत असताना अधिकारी लोकप्रतिनिधी उद्धट उत्तरे देतात. लोकप्रतिनिधीना विचारात न घेता महानगरपालिकेचे अधिकारी निर्णय घेतात. लोकहिताच्या कामामध्ये महापालिका प्रशासन तत्परता दाखवत नसल्याचाही आरोप यावेळी नियाज खान यांनी केला.
यावेळी बोलताना नगरसेवक राहुल चव्हाण यांनी, कोल्हापूर शहराकरिता मंजूर झालेल्या अमृत योजनेमध्ये उपनगरांप्रमाणे कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम समाविष्ट करावे हि मागणी करीत थेट पाईप लाईन चे काम रखडत असल्याबाबत आयुक्ताना जाब विचारला. स्पॉट बिलिंग पध्दत बदलण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना महापौर सौ. अश्विनी रामाने यांनी, येत्या सर्वसाधारण सभेमध्ये दररोज पाणी पुरवठा करण्याचा ठराव करून शहरवासियांना दररोज मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावर सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव नामंजूर झाल्यास लोकप्रतिनिधीना विचारात न घेता निर्णय घेणाऱ्या आयुक्तांचे पाणी कनेक्शन बंद करू, असा इशारा शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने दिला.
यावेळी माजी नगरसेवक राजू हुंबे, जयवंत हरुगले, रमेश खाडे, धनाजी दळवी, प्रकाश सरनाईक, दीपक गौड, किशोर घाटगे, अनिल पाटील, सुनील जाधव, विशाल देवकुळे, अमित चव्हाण, महिला आघाडीच्या सौ.मंगल साळोखे, सौ.पूजा भोर, सौ.गौरी माळदकर, रुपाली कावळे, सौ.मेघना पेडणेकर, सौ.शाहीन काझी, कपिल सरनाईक, सुनील भोसले, राजू काझी, गजानन भुर्के, उमेश जाधव, शैलेश साळोखे, शशिकांत रजपूत यांच्यासह शिवसैनिक, आणि महिला मोठ्या संखेने उपस्थित होते
Leave a Reply