
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आवश्यक असणाऱ्या स्वच्छता, पार्किंग, रुग्णवाहिका या गोष्टींच्या नियोजनाबरोबरच आयोजन समितीच्या मागणीनुसार मोर्चा दिवशी जिल्ह्यात ‘ड्राय डे’ घोषित केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताना सांगितले.मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात आयोजन समिती पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरतकुमार राणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक भानप यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकरी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चा शांततेत पार पाडताना स्वच्छतेबाबतही प्रत्येकाने काळजी घेऊन शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले,रुग्णांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच शहरातील मंगल कार्यालये तसेच लॉज याठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना त्यांनी आवाहन केले. पार्किंग बाबतची सर्व व्यवस्था पोलीस दल आणि महापालिकेने पूर्ण केली आहे. वाहतूकीस आडथळा होणार नाही या दृष्टीने वाहनांचे निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये पार्किंग करावे. याठिकाणी 108 तसेच 102 ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना त्यानी केली.
पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मराठाक्रांती मोर्चाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोजन समिती आणि पोलीस दलासमवेत झालेल्या चर्चेची आणि उपाययोजनेची माहिती दिली. यावेळी आयोजन समितीच्या वतीने प्रशासनास मार्चा अत्यंत शांततेत पार पडेल, असे सांगून काही मागण्या करण्यात आल्या, यावरही यावेळी चर्चा झाली.
Leave a Reply