
कोल्हापूर : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपारिक दसरा सण दरवर्षीप्रमाणेच ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्वीनीराजे छत्रपती, यशराज छत्रपती यांनी परंपरागत पध्दतीने मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन केले. यावेळी पोलीस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे गीत वाजविण्यात आले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने अपूर्व उत्साहात सोने लूटले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असतांना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली. डोळयाचे पारणे फेडणाऱ्या या क्षणाने तत्कालिन इतिहासाची साक्ष दिली.
या सोहळयास माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमलताई पाटील, महापौर अश्विनी रामाणे, खासदार धनंजय महाडिक, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सतेज पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समजितसिंह घाटगे, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, पोलीस उप अधीक्षक सोहेल शर्मा, सरदार,, मनसबदार यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर शहरासह अनेक तालुक्यातून आलेले नागरिक स्त्री-पुरुष, लहान मुले यांनी दसरा चौक परिसर गर्दीने फुलून गेला होता.
Leave a Reply