आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास प्राधान्य द्या:जिल्हाधिकारी

 

25_110_2016_photo_01कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक, तक्रार निवारण कक्ष, एक खिडकी तात्काळ सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा कोषगार अधिकारी रमेश लिधडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर किणिंगे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. वर्मा, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्कविभाग यांच्या प्रतिनिधीसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक 27 नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणूका मुक्त आणि निर्भय तसेच शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूकाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पथके प्राधान्याने कार्यान्वित करावीत. यामध्ये आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणूकीच्या क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, मिरवणूका, प्रचार फेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेचा भंग होईल अशा घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. भरारी पथक स्थापन करुन पैशाच्या व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हलचालीवर लक्ष ठेवून आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व नगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता भंगाची तक्रार स्विकारण्यासाठी व त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष प्राधान्याने स्थापन करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
नगरपरिषद निवडणूकांसाठी नगरपालिकास्तरावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवार राजकीय पक्षांना द्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्यासाठी एक खिडकी पध्दत तात्काळ सुरु करण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, नगरपरिषद निवडणूकांसाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शास्त्रोक्त आराखडा तयार करावा. तसेच खर्च नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी. संवेदनशिल आणि अति संवेदनशिल मतदार केंद्राबाबत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!