
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. या समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
कार्यक्रमास राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने प्रमुख उपस्थित होती. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या ‘बेटी बचाओ’अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिच्या नावाची घोषणा केली.
यावेळी कुलगुरू डॉ. वंजारी म्हणाल्या, अमर्याद एक्सलन्सचा आग्रह धरुन उच्चशिक्षणाचे क्षेत्र अनेक पैलूंनी सालंकृत करणाऱ्या कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते डॉ. देवानंद शिंदे यांच्यापर्यंत द्रष्टे नेतृत्व शिवाजी विद्यापीठास सातत्याने लाभले. याच्या परिणामी विद्यापीठाने संशोधनासह विविध क्षेत्रांत बहुआयामी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर विविध मानांकने या विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. सामाजिक जाणीवांतून निर्माण होणारी बांधिलकी, कर्तव्याची जाण आणि सारासार विवेक ही त्रिसूत्री पदवीइतकीच महत्त्वाची असून ज्या व्यक्तीमध्ये या तीन गोष्टी आहेत, तो एक उत्तम व यशस्वी माणूस बनतो, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. वंजारी पुढे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विद्यापीठांकडून अपेक्षित असणारी चतुःसूत्री सांगितलेली आहे. यामध्ये मानवता, सहिष्णुता, सत्यान्वेषण आणि कारणमीमांसा या चार मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापना करण्यासाठी विद्यापीठांनी कार्य करणे नेहरुंना अभिप्रेत होते. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची ही राष्ट्रीय उद्दिष्ट्येच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नसून त्यांची गरज नववर्तमानात अधिकच अधोरेखित झालेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या व्हीजन-२०२०च्या माध्यमातून या देशातल्या युवकांना ज्ञान, संपत्ती आणि अगदी अंतरीच्या दुःखाच्याही देण्यातला आनंद शिकविला आहे. आपले मन आणि काळीज वापरून या देशाच्या हिताचा वापर करण्याचे त्यांनी केलेले सूचन अत्यंत महत्त्वाचे आहे. राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे महत्त्व पटवून दिले
Leave a Reply