
कोल्हापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि वाणिज्य बँकांच्या माध्यमातून कालअखेर 54 कोटी रुपये तर पोष्टामार्फत 12 कोटी 35 लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत. या पुढील काळातही चलनातून रद्द केलेल्या नोटा बदलून देतांना बँकर्सनी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्राध्यान्य द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.चलनातून रद्द केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक रमेश पाटील, पोलीस उपअधिक्षक भरतकुमार राणे, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर बी. के. आरसेकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक शशिकांत किंणींगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील राष्टीयकृत व वाणिज्य बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कालपर्यंत राष्ट्रीयकृत व वाणिज्य बँकांमध्ये खातेदारांकडून 1200 कोटीची कॅश जमा झाली. तर 694 कोटी रुपये खातेदारांनी बँकांमधून काढले. 54 कोटी रुपये बदलून देण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. याशिवाय चलनातून रद्द झालेल्या रु. ५००/- व रु. १०००/- च्या नोटा बदलून देण्याचे काम कोल्हापूर डाक विभागाने हाती घेतले असून जिल्ह्यातील ९६ पोस्ट ऑफिसेसमधून आजअखेर 12 कोटी 35 लाखांच्या नोटा बदलून देण्यात आल्याचे वरिष्ठ डाक अधिक्षक रमेश पाटील यांनी यावेळी सांगितले.
चलनातून रद्द झालेल्या रु. ५००/- व रु. १०००/- च्या नोटा बदलून देण्याचे काम जिल्ह्यातील बँकर्स तसेच पोस्ट विभागाने उत्तमरित्या करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, यापुढील काळातही शासनाच्या व रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानूसार जिल्हृयातील बँकांनी नोटा बदलून देण्याचे तसेच एटीएम सेंटर्सद्वारे जनतेला पैसे उपलब्ध करुन देण्याचे काम प्रभावीपणे करावे, याकामी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस आपल्या पाठीशी असून आवश्यक ती सर्व मदत प्राध्यान्यक्रमाने उपलब्ध करुन दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पैसे बदलून घेण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना सर्व बँकर्सनी मदत करावी, अशी सूचना त्यांनी केली.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे साडेपाचशेच्या आसपास विविध बँकांचे एटीएम सेंटर्स असून सध्या जवळपास सव्वातीनशे एटीएम सेंटर्स पैशाच्या उपलब्धतेनूसार सुरु ठेवण्यात आली आहेत. सर्व एटीएम सेंटर्संना उपलब्ध होणारी कॅश सुयोग्यरितीने पुरविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बँकर्संना केली. सर्व बँकांनी आपआपसात समन्वय ठेऊन सध्यस्थितीत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जनतेच्या समस्या निराकरणासाठी तक्रार निवारण केंद्र कार्यन्वीत चलनातून रद्द झालेल्या रु. ५००/- व रु. १०००/- च्या नोटांच्या बाबतीत तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच सर्व संबधित एजन्सीमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियत्रण कक्षामध्ये तक्रार निवारण केंद्र कार्यन्वीत करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली. या तक्रार निवारण कक्षामध्ये अग्रीणी जिल्हा कार्यालयाचे अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून हे केंद्र येत्या 24 नोव्हेंबर अखेर कार्यरत राहणार असून जनतेने 1077 या टोल फ्रि क्रमांकांशी संपर्क साधावा असे आवाहन ही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
Leave a Reply