
कोल्हापूर: कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनचे साधक आणि दुसरे संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना येथील न्यायालयात उपस्थित करण्याविषयीचे यापूर्वी सादर केलेले आवेदन न्यायालयाने मान्य केले असून त्यांना २१ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी ३ जानेवारी या दिवशी दिला. सनातनचे साधक आणि मडगाव स्फोट प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना फरार आणि गुन्हेगार घोषित करून त्या दोघांची मालमत्ता जप्त करण्याची अनुमती द्यावी, असे आवेदन विशेष शासकीय अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात सादर केले; मात्र ‘हे न्यायालयाचे काम नसून पोलिसांचे काम पोलिसांनी करावे. दाऊद याची मालमत्ता जप्त करूनही पोलिसांना दाऊद मिळालेला नाही’, असे न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी अधिवक्ता राणे यांना सुनावत त्यांचे आवेदन फेटाळले. या वेळी न्यायालयात समीर गायकवाड यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन उपस्थित होते.
अधिवक्ता राणे यांनी वरील विषयासंदर्भात आवेदन सादर केले. त्या वेळी त्यांचा खरपूस समाचार घेतांना न्यायाधीश एल्.डी. बिले म्हणालेे विनय पवार आण सारंग अकोलकर यांच्या संदर्भातील खटला येथील न्यायालयात प्रविष्ट झालेला नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे आवेदन स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. पोलिसांनी त्या दोघांना फरार घोषित केले असल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांचे काम पोलिसांनी करावे, तेथे न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नाही.
तसेच हे काम करत असतांना शासकीय अधिवक्ता आणि पोलीस यांनी कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या खटल्याचा अभ्यास करूनच या प्रकरणी त्यांनी बोलले पाहिजे. कारण दाऊदची देशातील सर्व संपत्ती पोलिसांनी जप्त केली, तरी दाऊन अजूनही पोलिसांना मिळून आलेला नाही ! त्यामुळे नुसती मालमत्ता जप्त करून आरोपी मिळून येत नसतात, पोलिसांनी अन्वेषण करून आरोपींचा शोध घ्यावा, असे त्यांनी अधिवक्ता राणे यांना सुनावले. न्यायालयाने वरील आदेश दिल्यामुळे या प्रकरणी सनातनचा साधक आणि संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्चित करण्याविषयी आणि डॉ. तावडे यांच्यावरील खटल्यांची एकत्रित सुनावणी २१ जानेवारी या दिवशी होणार आहे. २१ जानेवारी या दिवशी पोलिसांना डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करावे लागणार आहे.
अधिवक्त समीर पटवर्धन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतांना ते म्हणाले, समीर गायकवाड यांना नियमितपणे सनातनचे ग्रंथ, दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभात देण्याविषयी वारंवार सांगितले आहे. तरीही कळंबा कारागृहातील पोलिसांकडून यांना नियमितपणे सनातनचे अंक आणि ग्रंथ मिळत नाहीत. गायकवाड यांना सनातनकडून नियमितपणे पोस्टाद्वारे कळंबा कारागृह येथे साप्ताहिक सनातन प्रभात पाठवले जाते; मात्र आतापर्यंत पोलिसांनी १९ पैकी केवळ ५ साप्ताहिक सनातन प्रभातचे अंक यांना दिले आहेत. पोस्टातून अंक पाठवले असतांनाही पोलिसांनी ‘उर्वरित अंक मिळाले नाहीत’, असे खोटे कारण सांगितले आहे. तरी गायकवाड यांना नियमित अंक मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा न्यायाधीश बिले यांनी गायकवाड यांना नियमितपणे अंक आणि ग्रंथ द्यावेत, असे पोलिसांना सांगून गायकवाड यांना आताही तुम्ही न्यायालयात अंक, ग्रंथ देऊ शकता, असे सांगितले. आतापर्यंत याविषयी पटवर्धन यांनी ५ ते ६ वेळा याविषयी तक्रार केल्यानंतर न्यायालयाने गायकवाड यांना अंक देण्यास सांगूनही पोलीस जाणीवपूर्वक त्यांना अंक देत नाहीत, हे सतत निदर्शनास येत आहे.
Leave a Reply