
कोल्हापूर:चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक चणचणीवर तातडीने तोडगा काढा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी येथे पुणे-बंगळूर महामार्ग रोखला. यावेळी भाजप सरकारचा निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंचगंगा पुलावर सुमारे तासभर आंदोलन झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. तसेच कोल्हापूर शहरातही वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर आ. हसन मुश्रीफ, महापौर हसिना फरास, खा. धनंजय महाडिक यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आंदोलन थांबवले. नंतर या नेत्यांची सुटका झाली.

मोर्चाच्या अग्रभागी वरील नेत्यांसह पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, आदिल फरास यांच्यासह अनेक नगरसेवक, त्याचबरोबर प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि तेथील पदाधिकारी, नगरपालिकांचे पदाधिकारी व नगरसेवक यांचा समावेश होता.
Leave a Reply