झी मराठीवर होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल खेळ

 

_MG_4940मुंबई:महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय असलेला आणि ज्यात सहभागी व्हावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा होम मिनिस्टर. मागील बारा वर्षांपासून अविरतपणे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. हा कार्यक्रम सादर करणारे निवेदक,सूत्रधार आदेश बांदेकर हे तर घराघरांत भावोजी म्हणून लोकप्रिय ठरले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांत जाऊन, गावात जाऊन होम मिनिस्टरने तेथील महिलांना या खेळात सहभागी करुन घेत त्यांना पैठणीसहित आनंदाचे अनेक क्षण दिले. आजही सायंकाळची साडे सहाची वेळ ही प्रेक्षकांसाठी झी मराठी आणि होम मिनिस्टरकरिता हक्काची वेळ असते. आपली हीच लोकप्रियता टिकवत हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत आहे. छोट्या पडद्याच्या विश्वात सलग बारा वर्षे चालणारा एकमेव दैनंदिन कार्यक्रम ही होम मिनिस्टरची आणखी एक ओळख. एका ठराविक अंतरानंतर एखादं नविन पर्व आणत विविध वयोगटांतील महिलांना सहभागी करुन घेण्याचा मानस होम मिनिस्टरचा आहे. सणाच्या निमित्ताने सादर होणा-या भागांचं तर वैशिष्ट्य काही औरच. वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देणारा हा सण. या गोड सणानिमित्त होम मिनिस्टरचा एक खास सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे येत्या १५ जानेवारीला. ज्यात सहभागी होणार आहेत झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या लोकप्रिय मालिकांमधील तुमच्या आवडत्या प्रमुख जोड्या. येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

डोंबिवली जिमखानामधील मैदानावर होम मिनिस्टरचाहा संक्रांत स्पेशल खेळ रंगला ज्यात झी मराठीच्या नायक नायिकांसह सामान्य महिलांनाही सहभागी होण्याची आणि पैठणीचा मान जिंकण्याची संधी मिळाली. ‘जय मल्हार’मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे आणि बानूची भूमिका साकारणारी ईशा केसकर, ‘माझ्या नव-याची बायको’मधील राधिका -अनिता दाते, शनाया -रसिका सुनिल, गुरुनाथ-अभिजित खांडकेकर, ‘खुलता कळी खुलेना’ मधील विक्रांत-ओमप्रक्राश शिंदे, मानसी-मयुरी देशमुख, मोनिका-अभिज्ञा भावे, ‘काहे दिया परदेस’मधील गौरी-सायली संजीव, शिव-ऋषी सक्सेना, ‘अस्मिता’-मयुरी वाघ आणि ‘हंड्रेड डेज’ मधील राणी-तेजस्विनी पंडित, नेहा-अर्चना निपाणकर आणि इन्स्पेक्टर अजय ठाकूर ही भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे आदी कलाकार सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!