
कोल्हापूर : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या निवडणूका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडव्यात यासाठी सर्व निवडणूक यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून निवडणूक विषयक जबाबदारी काटेकोरपणे पारपाडावी, निवडणुकीच्या कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिला.
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवडणूक नोडल ऑफिसर विवेक आगवणे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संनियंत्रण समिती तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, प्रत्येक तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेल्या व्हिडीओ ग्राफी सर्व्हेलियन्स पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, भरारी पथक, चेक पोस्ट पथक यामध्ये योग्य समन्वय ठेऊन त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कार्यक्षमपणे पार पाडल्या जातील याची दक्षता घ्या. बोर्ड, बॅनर, होर्डिग अशा जाहिराती तात्काळ काढण्याची कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा नंबर 0231-2651950 असा आहे
Leave a Reply