आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती

 

मुंबईजवळ रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील शिरढोण गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे श्रीमंत घराण्यात जन्मलेले वासुदेव हे एक सुदृढ बालक होते. गोरा वर्ण, सरळ नाक, पाणीदार निळसर रंगांचे डोळे अशी शरीरसंपदा त्यांना लाभली होती.
वासुदेव आठ वर्षाचे झाल्यावर त्यांना कल्याण येथील शाळेत दाखल करण्यात आले. सकाळी मराठी शाळा आणि दुपारी डॉ. विल्सन यांच्या शाळेत जांभेकर गुरुजींकडून इंग्रजी भाषा शिकायची असा त्यांचा दिनक्रम होता. इंग्रजी भाषेवर त्यांनी प्रभुत्त्व मिळवले होते.
१० फेब्रुवारी १८६० मध्ये त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव सईबाई असे होते. रेल्वे बोर्ड, ग्रँट मेडिकल  कॉलेज या ठिकाणी त्यांनी लेखनिक म्हणून नोकरी केली. सन १८६८ मध्ये त्यांची कन्या मथू हिचा जन्म झाला. त्यापूर्वीही त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. पण ते दोन महिन्यातच अल्पशा आजाराने मृत्यू पावला.
सन १८७० च्या सुमारास त्यांची आई सरस्वतीबाई अत्यंत आजारी होत्या. त्यांना शिरढोणला तिला भेटण्यास जाण्यासाठी हवी असलेली रजा सरकारकडून नाकारली गेली. तेंव्हा ऑफिसमध्ये नुसतीच चिट्ठी टाकून वासुदेव शिरढोणला आले. पण आईचे अंत्यदर्शन मात्र घेता आले नाही. त्याचवेळी आत्यंतिक क्रोधाने “जीवात जीव असेपर्यंत इंग्रजी सत्ता उलथून पाडल्याशिवाय रहाणार नाही.” अशी शपथ त्यांनी घेतली. आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने डिसेंबर १८७२ मध्ये “सार्वजनिक सभेची” स्थापना केली. जनहिताचे कार्य करण्यासाठी  पुढे त्यांनी ‘ऐक्यवर्धिनी’ नावाची संस्थाही  काढली. सन १८७४ मध्ये वामनराव भावे  यांच्या सहकर्याने राष्ट्रीय शिक्षणाची पाहिली शाळा काढली. हेच पुण्याचे ‘भावे स्कूल’.
याच काळात त्यांच्या पत्नी सईबाई अल्पशा आजारांनी स्वर्गवासी झाल्या. वासुदेवांनी सन १८७३ मध्ये दुसरा विवाह केला. आपल्या या द्वितीय पत्नीचे नाव गोपिकाबाई ठेवले. त्यांना त्यांनी लिहिणे वाचणे तर शिकवलेच पण त्याचबरोबर घोड्यावर बसणे, बंदुक चालवणे, दांडपट्टा फिरवणे इ. गोष्टी शिकवल्या. सन १९४० मध्ये गोपिकाबाईंचा मृत्यू झाला.
वासुदेवांनी स्वदेशी, स्वातंत्र्य, बलोपासना यांचे महत्त्व लोकांना पटवून दिले. अनेक तरुणांना एकत्र करून घनदाट अरण्यात बंदुक चालणे, घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे इ. शिक्षण दिले. या तरुणात लो. टिळकांचाही समावेश होता. दरवर्षी दसर्‍याला शस्त्रपूजन आणि दहीपोहे हातात घेऊन स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण्याची शपथ घेतली जात असे. परंतु त्याकाळच्या मध्यम वर्गियांना त्यांचे हे विचार पटले नाहीत. मग वासुदेवांनी खेडोपाडी जाऊन महार, मांग, रामोशी अशा लोकांच्या टोळ्यासुद्धा तयार केल्या. स्वांतंत्र्यसाठी शस्त्रास्त्रे व पैसा हवा होता; म्हणून श्रीमंत लोकांकडून स्वातंत्र्यासाठी पैशाची मागणी केली. ज्यांनी मदत देण्याचे नाकारले त्यांच्याकडून जबरदस्तीने घरात घुसून लुट करण्यात आली. सरकारी ऑफिसना आगी लावल्या गेल्या. रेल्वेलाइन ,टेलिफोन कनेक्शन तोडण्यात आली. ब्रिटिश सरकारने वासुदेवांना पकडण्यासाठी डॅनियल नावाच्या अधिकार्‍याची नेमणूक केली. पंढरपूरजवळील देवर नागवाडी गावाजवळ वासुदेवांना अटक करण्यात आली. आणि प्रथम ठाणा जेलमध्ये त्यांना ठेवले. काका जोशी यांनी त्यांची केस लढवली. पुढे उच्च न्यायालयात चिंतामणराव आपटे यांनी त्यांची केस लढवली. पण यश आले नाही. वासुदेवरावांना  काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पुढे ३ जानेवारी १८८० मध्ये त्यांना एडन तुरुंगात हलवण्यात आले. देशाची मूठभर माती धोतराच्या सोग्यात घेऊन ते एडनला पोहोचले.
तेथे “जेलमध्ये मरण्यापेक्षा क्रांति करून मेलेले बरे.” असा विचार त्यांच्या डोक्यात आला.  १२ ऑक्टोबर १८८० मध्ये जेलचे दरवाजे स्वतःच्या ताकदीने त्यांनी उपटून  काढले. शिडीसारखा त्यांचा वापर करून भिंतीवरून ते पळाले. पण लगेचच ते पकडले गेले. आता त्यांच्या पायाच्या घोटांच्या नसा ते पळून जाऊ नयेत म्हणून तोडून टाकल्या. जवळ जवळ ८० किलो वजनाचे साखळदंड मानेत, दंडात व पायात अडकवले. रोज पंचवीस किलो धान्य दळणे, बैलाप्रामाणे घाणीला जुंपणे, चाबकाचे फटके मारणे अशा शिक्षा देण्यात आल्या. पुढे त्यांना क्षयरोग झाला. आणि त्या आजारपणातच १७ फेब्रु १८८३ रोजी त्यांचा अंत झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!